SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR

संपत्ती निर्माण केल्यानेच समृध्दी येते.

जगात मर्यादित संपत्ती आहे हे खरे नाही. उद्यमशील श्रमातून नवीन संपत्ती निर्माण केली जाते. कोणी एकाने एका ठिकाणी संपत्ती निर्माण केल्याने दुसरीकडे गरीबी निर्माण होत नाही, दारिद्र्य निर्माण होत नाही. उद्यमशील लोक परिश्रमाने संपत्तीत भर घालणे हे कार्य साध्य करतात. अर्जित किंवा संचित संपत्ती समृध्दी आणते.

जगात अमुक इतकी संपत्ती असून ती मर्यादित आहे हे खरे नाही. एका कडून संपत्ती काढून घेऊन दुसऱ्याला दिल्या शिवाय समृद्धी येत नाही हेही खरे नाही. तरीही याच कल्पनेवर आपल्या देशातील समाज आणि सरकार गरिबी कमी करण्याचे , विकासाचे काम करते आहे.

संपत्ती किंवा समृद्धी निर्माण करण्याच्या प्रक्रियेतही सुरुवात समान स्तरांवरून झाली पाहिजे अशी मांडणी करणारेही एका पातळीवर संपत्तीच्या पुनर्वाटपाचे समर्थन करतात. पण यातून नागरिकांच्या सरकारमार्फत होणाऱ्या लुटीला मान्यतेचे अधिष्टान मिळते. मग ज्यांना संपत्ती निर्माण करायची नाही किंवा करता येत नाही असे लोक सोपा मार्ग म्हणून निर्माण केलेल्या संपत्तीची लूट करणे, अपहार करणे यालाच समृद्धीचा मार्ग मानतात. हे सगळेच लोक संपत्तीच्या पुनर्वाटपाची मागणी करतात. हळूहळू संपत्तीच्या निर्मितीऐवजी पुनर्वाटप हाच गरिबी हटवण्याचा मार्ग आहे ही मांडणी आणि मागणी होऊ लागते.

एकूणच संपत्ती निर्माण करणे, समृद्धी निर्माण करणे याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलायला लागतो. लोकांनी निर्माण केलेल्या मालमत्तेचा विद्वेष होऊ लागतो. लोक संधी मिळेल तेंवा सहजच खाजगी आणि सरकारी मालमत्तेचा विध्वंस करायला बिचकत नाहीत. एखाद्याने हटकलेच तर ‘मी सरकारचे नुकसान करतोय (किंवा खातोय), तुझ्या बापाचे तर नाही ना?’ असे उत्तर मिळालेच पाहिजे अशी मानसिकता झाली आहे. किंबहुना सरकारला बुडवणे, कायदे मोडणे, हे फुशारकीचे काम झाले आहे.

इतकेच नाही तर असे लोक संपत्तीच्या निर्मिती करणाऱ्यांना समृद्धी निर्माण करण्यात अटकाव करतात. त्यांच्या बद्दल आकस धरतात. त्यांचेवर नियंत्रण करून निर्मित संपत्तीचा अपहार करण्याच्या व्यवस्था निर्माण करतात.

आज आजूबाजूला चालू असलेल्या बहुतेक चळवळी वेगवेगळ्या मार्गाने सरकारकडून संपत्तीच्या पुनर्वाटपाचीच मागणी करीत आहेत. शिक्षण, आरोग्य, अन्न, पाणी, इंधन, वाहतूक, निवारा, बालक-वृद्ध-अपंग व बेरोजगार यांची जबाबदारी सरकारने घ्यावी- म्हणजे सरकारने संपत्ती निर्माण करणाऱ्यांकडून कररूपाने संपत्ती जमा करावी आणि हा सगळा खर्च करावा अशी अशी त्यामागची धारणा आहे. आता त्यात नवविवाहितांचा संसार थाटून देणे, टिवी, फोन, संगणक यांचीही भर पडली आहे.

या सगळ्या कामात सरकारातील लोक म्हणजे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी-कर्मचारी यांना प्रचंड भ्रष्टाचार करायला संधी मिळते. तेही एक कल्याणकारी कार्यक्रमांच्या लोकप्रिय असण्याचे कारण होऊन बसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *