SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR

शेतकरी संघटनेचे अर्थशास्त्र

शेतकरी संघटनेचे अर्थशास्त्र : खंडन-मंडन या पुस्तिकेतील भाषणांमधून व्यक्त झालेली एकूणच मांडणी शेतकरी संघटनेचे आपल्या अर्थव्यवस्थेचे आकलन स्पष्ट करणारी आहे.

1983 च्या सुमारास संघटनेत कार्यरत असणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना ही मांडणी लक्षात असेलच. शिवाय ही व्याख्याने खुल्या मंचावर झाली होती आणि त्यांचे रिपोर्टिंग सर्व वर्तमानपत्रातून त्याकाळी झाले होते. त्यावर अग्रलेखही छापून आले होते. संघटनेच्या सर्व आंदोलनातून व्यक्त होणारी ही मांडणी शेतकरी संघटनेची भूमिका स्पष्ट करणारी ठरते.

स्वातंत्र्य मिळण्याआधी इंग्रजांचे आणि त्यानंतर स्वतंत्र भारतातील इंडियाचे भारतावरील वसाहतवादी धोरण ही या देशातील मुख्य समस्या राहिली आहे. भारताला दुसऱ्या स्वातंत्र्याची प्रतीक्षा आहे.

समाजवादी आणि डाव्यांच्या प्रभावाखाली नेहरू-महालनोबीस यांनी राबवलेल्या योजनातून तयार झालेले इंडियाचे भारतावरील वसाहतवादी धोरण ही या देशातील मुख्य समस्या आहे. या मार्गाचा अवलंब करणाऱ्या रशिया -चीन यांना आदर्श मानणाऱ्या जगातील सर्व देशातही हीच समस्या कमी-अधिक प्रमाणात आहे.

आपल्या देशात आजपर्यंतच्या सर्व सरकारांनी हेच धोरण राबवले आहे. त्यामुळे भारत -इंडिया या दोघांचीही सर्व क्षेत्रातील नैसर्गिक वाढ, प्रगती आणि समृद्धी रोखली गेली आहे. अकार्यक्षमता, भ्रष्टाचार, भामटेगिरी, गुंडगिरी, गुन्हेगारी, अनारोग्य, कुशिक्षण, बेकारी, बकाली, असुरक्षितता आणि अराजकता यांनी जनजीवन झाकोळून गेले आहे.

म्हणून ही समस्या इंडिया-भारत संघर्षातून किंवा भारतातून पळून जाऊन इंडियात सामील झाल्याने दूर होणार नाही. त्यासाठी इंडियाला वसाहतवादी धोरण बदलायला भाग पाडावे लागेल. रशिया -चीन यांना आदर्श मानणाऱ्या ज्या देशांनी १९९० नंतर वेगाने धोरण बदलले तेच देश आज समृद्धीकडे वाटचाल करीत आहेत. आपल्या देशातही ९० नंतर काही जुजबी बदल झाले पण तेही इंडियात. त्यामुळे देशांतर्गत वसाहतवादी व्यवहार तसेच राहिले. काही बाबतीत (उदा. शेती) बळावलेही.

आजूबाजूला आहेत ते किंवा याच चौकटीतील नवे राजकीय पक्ष यांचा देशांतर्गत वसाहतवाद संपवण्यासाठी काही उपयोग होणार नाही. त्यांचेपैकी कोणीही आजपर्यंत तशी स्चतंत्रतावादी भूमिका घेतलेली नाही.

शांततेच्या, प्रबोधनाच्या आणि गांधीजींच्या सत्याग्रहाच्या अहिंसक मार्गाने चालणारी स्चतंत्रतावादी चळवळच इंडियाचे वसाहतवादी धोरण बदलू शकते.

– मानवेंद्र काचोळे, औरंगाबाद.

______________

*शेतकरी संघटनेचे अर्थशास्त्र : खंडन-मंडन*

हे ‘शेतकरी प्रकाशना’च्या पहिल्या तीन पुस्तकांच्या प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने सर्वश्री प्रल्हाद कराड पाटील, माधवराव खंडेराव मोरे, डॉ. वि. म. दांडेकर आणि शरद जोशी यांनी २० फेब्रुवारी १९८३ रोजी पुणे येथील टिळक स्मारक मंदिरात केलेल्या भाषणांचे संकलनरूपातील पुस्तक खालील लिंकवरून डाउनलोड करता येईल.

https://w.wiki/Vfw

धन्यवाद.

सुरेशचंद्र म्हात्रे*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *