SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR

लोकहितवादी

lhw

खुल्या व्यवस्थेचे समर्थन करणारा भारताचा उदारमतवादी विचारवंत

लोकहितवादी ऊर्फ गोपाळ हरि देशमुख

आज लोकसत्ता दैनिकात मराठीच्या अंगाने विचार करणारा प्रसाद हावळे यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. यात गोपाळ हरि देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांच्या दोन लेखातील उतारे दिले आहेत. पहिल्या लेखात दिलेली लोकधारणांची यादी आजही ताजी वाटावी अशी आहे. नंतरच्या लेखातील लेखकाचे उदारमतवादी विचार सरकारच्या भुमिकेबाबत आहेत. किमान सरकार कसे असावे याची ती मांडणी आहे. मराठीत खुल्या व्यवस्थेच्या पुरस्कार या आधी केलेला वाचण्यात नाही. येथे प्रसाद हावळे यांच्या लेखातील काही भाग सादर करीत आहे.

… पेशवाईच्या अस्तानंतर इथल्या समाजाला उदारमतवाद, नव्या विद्याशाखा, विज्ञाननिष्ठा, उद्यमशीलता यांची ओळख नुकतीच होऊ लागली होती. लोकहितवादींनाही या नव्या विचारांविषयी आस्था होती. या पाश्र्वभूमीवर आपल्या समाजातील आचार-विचार ताडून पाहिले तर मोठी निराशाच पदरी येणार होती. ती लोकहितवादींच्याही पदरी आलीच आणि ते इथल्या समाजाची कठोर चिकित्सा करण्यासाठी उभे ठाकले. ती करताना त्यांनी आपली मते कोणतीही भीडभाड न ठेवता मांडली. ‘शतपत्रे’ वाचताना ते जाणवतेच. खरे तर ‘प्रभाकर’मध्ये असे १०८ पत्रलेख प्रसिद्ध झाले होते. त्यात ‘इंदुप्रकाश’ आणि अहमदनगरच्या ‘वृत्तवैभव’ या साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या निबंधांची भर घालून १९५ निबंधांचा ‘लोकहितवादीकृत निबंधसंग्रह’ १८६६ मध्ये  प्रकाशित झाला होता. याच संग्रहाची शतसांवत्सरिक आवृत्ती १९६७ मध्ये मुंबईच्या पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केली. ती अ. का. प्रियोळकरांनी संपादित केली होती. त्यातील २९ जानेवारी १८६५ रोजी लिहिलेल्या ‘सरकारनें काय करावें?’ या निबंधातील हा उतारा पाहा-

‘‘आतां या जगामध्यें अनेक देश आहेत, त्यांमधून पाहिलें तर कोठें वंशपरंपरेचे राजे आहेत. कोठें लोकसत्तात्मक राजे आहेत. कोठें मनस्वी राजे आहेत व कोठें प्रतिबंधित राजे आहेत, असें दिसून येतें. याप्रमाणें सर्व मासले हल्लीं पृथ्वीवर आहेत. याविषयीं विचार केला तर असें दिसतें कीं, ज्या ज्या देशांत जसजशी लोकांची स्थिती आहे तसेंतसें तेथील राज्य आहे. देशांतील लोकांची जशी स्थिती आहे तशीच तेथें वहिवाट चालते. आणि त्या धोरणानें जुलमी कायदे किंवा मोकळिका मिळतात. घरांत जो वडील असतो तो आपले कुटुंबातील लोक जसे शाहाणे असतील तदनुसार त्यास स्वतंत्रता उपभोगूं देतो. आणि लहान बालकें असतील त्यांस दटाऊन ठेवितो. कारण त्यांस मोकळीक दिली असतां तीं भलतेंच करतील. त्यांचे अंगीं मोकळीक वागविण्याचें सामथ्र्य आलें म्हणजे त्यांचे कलावर त्या वडील माणसांची वागणूक होते. व तसें न होईल तर तें कुटुंब लागलेंच विभक्त होऊन त्या वडिलांच्या सत्तेचा त्याग करितें. तद्वत सरकार निर्बल किंवा रयत अधिक शाहाणी झाली म्हणजे त्यांचा परस्पर मेळ राहात नाहीं..

सरकारचे वागणुकीचे कांहीं अवश्य धर्म आहेत. त्याप्रमाणे सरकार चाललें म्हणजे प्रजा अर्थातच सुखी होते. प्रजेस सुखी असावें अशी स्वाभाविक इच्छा आहे. परंतु त्यास प्रतिबध्धक ज्या गोष्टी आहेत त्या नाहींशा झाल्या म्हणजे बाकी सर्व तजवीज प्रजा आपण होऊन करितात. रोगाचें मुख्य कारण दूर झालें म्हणजे रोग जातो. त्याप्रमाणें हरकती दूर झाल्या म्हणजे प्रजा सुखी व उद्योगी होते. मग प्रजेस सरकारांनीं पैसा दिला पाहिजे असें नाहीं व सुखी होण्याकरितां खजिना लुटविला पाहिजे असें नाहीं. जितका रयतेस सरकारचा बेभरवसा तितका जुलूम होतो. याजकरितां सरकारने जितका देववेल तितका दिलभरवसा रयतेस दिला पाहिजे व कायदे करून ते कोणी तोडणार नाहींत, असा बंदोबस्त ठेविला पाहिजे. उगीच डामडौलाकरितां किंवा दुष्ट कामाकरितां सरकार कर बसऊं लागेल तर अन्याय आहे. शत्रूनाशाविषयीं सरकारनें  शूर असावें पण क्रूर असूं नये. आपली सत्ता वाढविण्याकरितां व लोभाकरितां नाना प्रकारच्या गैरमसलती काढून त्या खर्चाकरितां प्रजेवर कर बसविला तरी तो जुलूमच आहे. लोकांस अज्ञानांत ठेविलें तरी तोही जुलूम आहे आणि सरकार जो कर घेतें, तो केवळ कर्ज आहे. त्याची झाडाझडती बरोबर व यथान्याय द्यावी, असें सरकारांनीं मनांत वागविलें पाहिजे. नाहींतर ‘राज्याअंतीं नर्क’ हेंच खरें आहे व याच वाक्यास अनुसरणारे चोर राजे बहुत आहेत. त्यांत मनस्वी राजे तर धुमश्चक्रीच करितात. कारण त्यांस कांहीं जबाबदारी व विचारपूस नसते व लोक जुलूमानें दीन झालेले असतात..

सरकार चालविण्यामध्यें मुख्य मर्म असें आहें कीं, सरकार जितकें घटत जाईल तितकें बरें आहे. व लोकांची सत्ता जितकी वाढत जाईल तितकी चांगली आहे. अगदी सरकारची गरज नाहीं अशी स्थिती असावी, असें मनांत येतें; पण अशी स्थिती लोकांस प्रत्यक्ष कधीं येईल असें तर दिसत नाहीं. पण जितकी सरकारचे गरज कमी होऊन लोकांचे हातीं कारभार येईल तितकें चांगलें आहे.. केवळ अडाणी देशांत सरकार मायबाप असतें. किंवा सरकार चोर असतें. मध्यम सुधारलेले देशांत सरकार मित्र असतें. व फार सुधारलेले देशांत सरकार चाकर आहे असें मानून सरकाराशीं लोक वागतात. सरकारचे गैरवाजवी सत्तेची वृध्धी होऊं देत नाहींत व सरकारच्या चुक्या सरकारास सांगतात. व त्यांचे दोष छापून प्रसिद्ध करितात. वाईट सरकारांत अशी कारभाराची प्रसिद्धि नाहीं. तेथें सर्व गुप्तपणा असतो. परंतु चांगले सरकारांत सर्व कारभार उघडा असतो. पाहिजे त्याणें पाहावा. ज्ञानावर सरकारचा प्रतिबंध नसतो. परंपरेचे राज्याचें सरकार असो किंवा कारभारी यांचें सरकार असो किंवा सत्तात्मक सरकार असो, त्यांत कांहीं चोरी नसते. सरकार आपले कारभाराचे प्रसिध्धीस अनुकूल होऊन लोकांस माहिती सांगतें. आणि हेंच चांगलें राजाचें लक्षण आहे. राज्य कोणाचेंही अजरामर नाहीं. परंतु अशा पायावर बांधलेली इमारत फार दिवस टिकते व पेंढारीपणाचें चोरटें राज्य व त्या राज्यांतील प्रजा निर्बळ होऊन त्वरित नाशाप्रत पावते.’’

http://www.loksatta.com/marathi-valan-news/gopal-hari-deshmukh-and-his-contribution-to-marathi-language-development-1398821/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *