SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR

भारताच्या समृद्धी साठी मार्शल प्लान हवा

cropped-aasu.png

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पन्नास वर्षात शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचे काय झाले याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी अमरावतीला १०-१२ डिसेम्बर १९९८ ला भरलेल्या  जनसंसदेत आणि त्या पाठोपाठ  चंदिगढ, तिरुपती येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या अधिवेशनात भारताचे स्वातंत्र्य मिळण्याआधीच लुटले गेले हे स्पष्ट झाले होते.

तिरुपतीच्या तीन दिवस झालेल्या चर्चेत आपल्या गरजेपुतेच पिकवण्याचे आंदोलन सुरु करण्याचा विषय जोरात होता. नंतर कृती कार्यक्रमाच्या ठरावातही याचा उल्लेख होता. त्यावरून वर्तमानपत्रात खूप गदारोळ झाला. त्यावर शरद जोशी यांनी गेल्या पन्नास वर्षातील शेतीच्या लुटीचा हिशेब समोर ठेवून इंडिया अजूनही लुटीचे धोरण जोमाने राबवत असल्याने असा ठराव करण्याची भाषा शेतकरी करीत आहेत हे स्पष्ट केले.

डंकेल करारानंतरही भारत सरकारने शेतीच्या लुटीचे धोरण कायम ठेवल्याने शेतीची आणि शेतकऱ्यांची अवस्था बिकट होते आहे हे आ शरद जोशी यांनी टास्कफोर्स चे अध्यक्ष असतांना, नंतर राज्यसभेत असतांना आणि त्यानंतरही वारंवार मांडले.

तिरुपती अधिवेशनानंतर आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पाठोपाठ येणारे दुष्काळ आणि शेतीबाहेर पडून काही करण्याची इच्छा असलेल्या  तरुणांची कोंडी यातून सावरण्यासाठी ‘भारता’ च्या आर्थिक पुनर्रचनेची गरज आहे अशी मांडणी शरद जोशींनी केली आहे. त्यासाठी दुसऱ्या महायुद्धात उध्वस्त झालेल्या युरोपातील इंग्लंड, फ्रांस, इटली, जर्मनी, नेदरलंड आदि देशांसाठी जनरल मार्शल यांनी सुचवलेल्या मार्शल प्लान च्या सारखी विस्तृत योजना हाती घ्यावी लागेल.

ग्रामीण अर्थकारणाला सावरून गती देण्यासाठी तीन प्रमुख गोष्टीची आवश्यकता आहे.

  • १. शेतकऱ्यांच्या गळ्यातले कर्जाचे, वीजबिलाचे लोढणे काढून टाकणे कारण ही कर्जे बेकायदा व अनैतिक आहेत.

  • २. शेतकऱ्याचे  बाजाराचे व तंत्रज्ञाचे स्वातंत्र्य तत्काळ  पुनर्स्थापित करणे.

  • ३. शेतीविरोधी धोरणे बदलून शेतीच्या  अर्थकारणाची पुनर्रचना करणे.ज्यामुळे त्यांची भांडवल, तंत्रज्ञान , निविष्ठा, मुलभूत संरचना, बाजार आदी यांची गरज पूर्ण होईल.

भल्याभल्यांनाही या गंभीर प्रश्नाचे  पुरते आकलनही अद्याप झालेले नाही असे वाटते. गेल्या काही महिन्यात ग्रामीण भागातील अस्वस्थता सगळ्यांनाच जाणवते आहे. नुकत्याच नीती आयोगाने शेतीसंदर्भात हाती घ्यावयाच्या कार्यक्रमाबद्दल वाचण्यात आले. दुर्दैवाने त्यांनाही भारताच्या या टिकटिकणाऱ्या स्फोटक वास्तवाची कल्पना नाही असे दिसते.

ही मांडणी विस्ताराने करण्यासाठी एक स्वतंत्र  ब्लॉग सुरु केला आहे. तो इथे बघता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *